हजारीबाग (झारखंड) - ‘पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षांत पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील आणि या दोन्ही बाजूंच्या सुमारे ६० किमी अंतरातील मोकळ्या जागांवर कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिली.
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५९व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पथसंचलनाची सलामी घेतल्यानंतर शाह बोलत होते. केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने नऊ वर्षांत भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सुमारे ५६० किमी अंतरावरील कुंपण आणि अंतर भरून काढले आहे. भारताच्या पश्चिम आणि पूर्वेकडील या दोन सीमांमधील सर्व मोकळ्या जागा भरल्या जात आहेत आणि केवळ ६० किमीचे काम शिल्लक आहे, असे शाह म्हणाले. सीमेवर अनेक ठिकाणी पाणी, डोंगराळ आणि दलदलीचा भाग आहे आणि येथे कुंपण घालणे खूप कठीण काम आहे.
‘बीएसएफ’ने सीमारक्षक म्हणून ठसा उमटवला‘बीएसएफ’च्या स्थापनादिनी, मी या उत्कृष्ट दलाचे कौतुक करतो, ज्याने आमच्या सीमांचे संरक्षक म्हणून ठसा उमटवला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदत कार्यादरम्यान ‘बीएसएफ’च्या भूमिकेचेही मला कौतुक करायचे आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सुरक्षेला प्राधान्यगृहमंत्री म्हणाले की, देशात जेव्हा-जेव्हा भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हा सीमा सुरक्षेला प्राधान्य दिले गेले, मग ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असो किंवा मोदी सरकार. आम्ही रेल्वे, रस्ते, जलमार्ग कनेक्टिव्हिटी आणि टेलिफोन संपर्क मजबूत केला आहे.