ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. दरम्यान, या निर्णयानंतर बँकांमध्ये 60 लाख वैयक्तिक आणि कंपन्यांच्या खात्यांमध्ये दोन लाखांहून अधिक रकमेच्या ठेवी जमा झाल्या असून, त्यामाध्यमातून बँकांमध्ये तब्बल 7 ट्रिलियन रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. आता बँक खात्यात पैसे जमा झाले म्हणजे ते पैसे व्हाइट झाले, असा त्याचा अर्थ होत नाही. मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करणाऱ्यांपैकी जे या रकमेबाबत योग्य पुरावे सादर करण्यास अपयशी ठरतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला आहे.
बँकात ठेवी जमा करणाऱ्या कुठल्याही सर्वसामान्य ठेविदारांना त्रास दिला जाणार नाही. पण काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रूपांतर करण्यांच्या प्रयत्नात असलेल्यांवर कारवाई होणार असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, ते म्हणाले, "पैसे बँकांमध्ये जमा झाले म्हणजे ते पांढरे झाले, असा लोकांचा समज आहे. पण ते खरे नाही. बँकेत जमा होत असलेल्या दोन लाख, पाच लाख रुपयांवरील ठेवीची माहिती आम्ही नियमितपणे घेत आहोत. तसेच त्या व्यक्तींच्या याआधीच्या व्यवहारांची माहिती घेत आहोत." तसेच काळ्या पैशाच्या जंजाळातून सुटका करून घेण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत काळा पैसा जमा करण्याचा पर्याय काळा पैसावाल्यांकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.