नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी किमान किमतीचे प्लान बाजारात आणले आहेत. यामुळे आता अनेकांना दोन-दोन सिम कार्ड वापरण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आगामी सहा महिन्यांत अधिकचे सिम कार्ड वापरण्याचा ट्रेंड कमी होण्याची शक्यता आहे. त्यातून सुमारे ६0 दशलक्ष सिम कार्ड बंद होतील, असे दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.आॅगस्ट महिन्यातील मिळालेल्या आकडेवारीनुसार भारतात १.२ अब्ज मोबाइलचे वापरकर्ते आहेत. यापैकी केवळ एक सिम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या ७३0 ते ७५0 दशलक्ष इतकी आहे. उरलेल्या ग्राहकांकडे दोन-दोन सिम कार्ड आहेत.सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे (सीओएआय) महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले की, बंद होऊ शकणारे आणि नव्याने दिले जाऊ शकणारे सिम कार्ड यांचा एकत्रित विचार केल्यास आगामी सहा महिन्यांत दूरसंचार कंपन्यांची ग्राहकसंख्या २५ ते ३0 दशलक्षांनी कमी होईल, असे मला वाटते.डेलॉइट इंडियाचे भागीदार हेमंत एम. जोशी यांनी सांगितले की, विविध कंपन्यांच्या प्लानमध्ये असलेला फरक आणि कंपनीकडून दिल्या जाणाºया सेवेचा दर्जा यांचा लाभ घेता यावा यासाठी लोक दोन-दोन सिम कार्ड वापरत असतात. आघाडीच्या तीन मोठ्या कंपन्यांचे दर आणि दर्जा आता समान झाल्यामुळे लोक एकच सिम कार्ड वापरण्यास प्राधान्य देतील, असा अंदाज आहे.आघाडीच्या कंपन्यांचे असे आहेत नवे प्लानभारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांनी ३५ रुपये, ६५ रुपये आणि ९५ रुपयांचे किमान रिचार्ज प्लॅन आणले आहेत. यांची वैधता २८ दिवसांची आहे. रिचार्ज न केल्यास ग्राहकाचे आऊटगोइंग एक महिन्यात बंद केले जाईल, तसेच इनकमिंग ४५ दिवसांत बंद केले जाईल. दोन्ही कंपन्यांचे हे किमान प्लान जिओच्या ४९ रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत. शिवाय कार्ड सुरू ठेवण्यासाठी किमान रिचार्जही बंधनकारक आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढे एकच कार्ड ठेवणे भाग पडेल, असे जाणकारांना वाटते.
भारतातील ६0 दशलक्ष मोबाइल सिम कार्ड ६ महिन्यांत होणार बंद?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 2:05 AM