काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 06:50 AM2024-10-17T06:50:39+5:302024-10-17T06:52:41+5:30
काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली चार तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.
आदेश रावल -
नवी दिल्ली : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्यूला अंतिम टप्प्यात असतानाच काँग्रेसने दिल्लीत झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत ६० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. ८४ नावांवर चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली चार तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीत चर्चेदरम्यान ३० जागांवर एकच नाव, तर २० जागांवर दोन नावे पुढे आली होती. १५ जागा वादग्रस्त होत्या. चर्चेअंती ६० मतदारसंघांसाठी उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
पुढे काय? : उर्वरित जागांसाठी १८ तारखेला पुन्हा बैठक होणार आहे. त्यानंतर २० तारखेला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सर्व नावांची चर्चा होईल. त्यानंतर काँग्रेसची पहिली यादी येईल, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत
मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी ३३ जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यामध्ये उद्धवसेनेच्या वाट्याला काँग्रेस आणि शरद पवार गटापेक्षा जास्त जागा येतील. उर्वरित ३ जागांचा तिढा २ ते ३ दिवसांमध्ये सोडविला जाईल आणि महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जानकरांनी सोडली महायुती, रासप लढणार स्वबळावर
महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली. - सविस्तर/५
बसपही महाराष्ट्रात सर्व जागा लढणार
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मायावतींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवेल.