नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात हँडपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने तब्बल 60 हून अधिक लोक आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकांनी उलट्या आणि जुलाबाची तक्रार केल्यानंतर एकच खळबळ उडाली. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने आरोग्य विभागाचे पथक पाठवले. यासोबतच तो हँडपंपही बंद करण्यात आला आहे. सागर जिल्ह्यातील बांदा ब्लॉकमधील पिडरुआ गावात हँडपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने ही भयंकर घटना घडली आहे.
आरोग्य विभागाने परिसरात शिबिरे घेऊन जनजागृती सुरू केली आहे. पावसात पाणी कसे प्यावे हे ग्रामस्थांना सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर जिल्ह्यातील पिडरुआ येथे रविवारी एकामागून एक 60 लोक आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी सुरू झाल्या. सर्वांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तर 25 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे 25 रुग्ण वगळता उर्वरित रुग्णांची प्रकृती सामान्य आहे. याची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे कर्मचारी कामाला लागले असून, आता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून औषधांचे वाटप करण्यात येत आहे.
पावसात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे. पावसाचे पाणी आजूबाजूला साचते अशा ठिकाणी हँडपंप बसवले आहेत. हँडपंपाच्या आजूबाजूला पाणी साचल्यानंतर त्याचे पाणी वापरल्याने उलट्या, जुलाबाच्या समस्या होत आहेत. पहिल्या दिवशी उलट्या व जुलाबाचे प्रमाण कमी होत होते, मात्र रविवारी हा त्रास वाढल्याने आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी दीपक आर्य यांच्या सूचनेवरून सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
दूषित पाणी देणारे हँडपंप तातडीने बंद करण्यात आले असून आजूबाजूला क्लोरीनची फवारणी करण्यात येत आहे. संबंधित गावाव्यतिरिक्त इतर गावांमध्ये असा धक्कादायक प्रकार घडू नये यासाठी तातडीने क्लोरीन व पाणी स्वच्छ करण्यासाठी औषधांची फवारणी करावी, तसेच गावांमध्ये उभारलेल्या विहिरींमध्ये क्लोरीन पावडर टाकण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.