बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील श्री चैतन्य शैक्षणिक संस्थेतील 60 मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत बंगळुरू शहरचे उपायुक्त जे मंजुनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री चैतन्य शिक्षण संस्थेच्या एका विद्यार्थ्याने रविवारी संध्याकाळी उलट्या आणि अतिसाराची तक्रार केली. यानंतर संस्थेताल 480 विद्यार्थ्यांची चाचणी केली असता, 60 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
मंजुनाथ पुढे म्हणाले की, श्री चैतन्य शैक्षणिक संस्था एक बोर्डिंग स्कूल आहे. मागच्या महिन्यातच शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना बोलावले होते. तेव्हा त्या सर्वांची चाचणी केली होती, पण कोणीच पॉझिटिव्ह आढळला नाही. सध्या पॉझिटिव्ह आलेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी फक्त 2 मुलांमध्ये लक्षणे आहेत. सध्या या सर्व मुलांना देखरेखखाली ठेवण्यात आलं असून, 7 दिवसानंतर पुन्हा सर्वांची चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, मुलं पॉझिटिव्ह आल्यानंतर 20 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
629 नवीन रुग्णांची नोंदमंगळवारी कर्नाटकात 629 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या बुलेटिननुसार, राज्यातील एकूण बाधितांची संख्या 29,74,528 आणि मृतांची एकूण संख्या 37,763 झाली आहे. तसेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 12,634 आहे.
देशातील कोरोना स्थितीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत नव्या 18 हजार 780 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 378 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढून 4,47,751 झाला आहे. सध्या देशात 2,82,520 लोकांवर उपचार सुरू आहेत. मार्च 2020 नंतर हा दर सर्वात कमी आहे.