लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांशी संबंधित ठिकाणांवर ईडीने घातलेल्या धाडीत १ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. तसेच या कुटुंबाने ६०० कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे केल्याचे धागेदोरे हाती लागले असल्याचा दावा ईडीने शनिवारी केला.
रेल्वेत नोकऱ्या देण्याच्या बदल्यात उमेदवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या जमिनी यादव यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या नावावर केल्याचा आरोप झाला होता. ईडीने यादव कुटुंबीयाची निवासस्थाने व त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर शुक्रवारी धाडी घातल्या होत्या. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही धाड घालण्यात आली होती. घोटाळ्यांतून मिळालेला पैसा यादव कुटुंबीयांनी विविध ठिकाणी गुंतविल्याचा दावा ईडीने केला आहे.
असे आहेत आर्थिक घोटाळे
लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी व त्यांच्याशी संबंधित लोकांनी विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनींची, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कागदपत्रे, खरेदीखते ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. या कागदपत्रांतून बेनामी संपत्तीचाही शोध लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यादव कुटुंबीयांनी ६०० कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे केल्याची शक्यता असून त्यातील स्थावर मालमत्तेचे घोटाळे ३५० कोटींचे व बेनामी व्यवहारांतून २५० कोटींचे गैरव्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे.
यादव कुटुंबीयांकडे मिळाले हे घबाड
ईडीने सांगितले की, लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांशी संबंधित ठिकाणांवर घातलेल्या धाडीत १ कोटी रुपये बेहिशेबी रक्कम, १९०० डॉलरच्या नोटा व अन्य परकीय चलन. ५४० ग्रॅम सोने, १.५ किलो सोन्याचे दागिने ताब्यात घेण्यात आले. या दागदागिन्यांची किंमत १.२५ कोटी रुपये आहे.
घोटाळा काय?
२००४ ते २००९ या कालावधीत यूपीए सरकारमध्ये लालूप्रसाद रेल्वेमंत्री होते. त्या काळात रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात ते उमेदवार आपली जमीन यादव कुटुंबीयांना एकतर भेटस्वरूपात देत असत किंवा त्यांना जमीन बाजारभावापेक्षा कमी दराने विकत असत.
मुंबईचे कनेक्शन
ईडीने दावा केला की, यादवांनी बंगला खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर रोख रकमेचे व्यवहार केले. मुंबईत रत्ने, दागिन्यांच्या व्यापारातील कंपन्यांचीही मदत घेण्यात आली असावी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"