ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ३० - आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा झाली तर हजारो किलोमीटर प्रवास करुन आपण त्या व्यक्तीला भेटायला जातो. आणि इतका लांबचा प्रवास करायचा असेल तर गाडी, ट्रेन नाहीतर विमान हे ठरलेले पर्याय असतात. मात्र मुंबईतील एका अवलियाने आपल्या लाडक्या कुत्र्याला भेटण्यासाठी चक्क ६०० किमी प्रवास केला आहे. तुम्ही म्हणाल त्यात नवल काय ? पण अश्विनने हा प्रवास सायकलवरुन केला आहे.
अश्विन चिंचखेडे हा मुंबईत मिडियामध्येच काम करतो. काही वर्षोपुर्वी त्याचे वडील कुत्रा कोकोला घेऊन अहमदाबादला शिफ्ट झाले. मात्र कोकोच्या अशा अचानक जाण्याने अश्विनला बैचेन झाले. त्याला सतत कोकोची आठवण येऊ लागली. आणि तेव्हाच अश्विनने कोकोला भेटण्यासाठी अहमदाबादला जाण्याचा निर्णय घेतला.
अश्विनने मुंबई ते अहमदाबादचा प्रवास सायकलवरुन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने काही तज्ञांशी बातचीतदेखील केली आणि त्याप्रमाणे प्रवासाची तयारी केली. प्रवासात येणा-या अडथळ्यांची कोणतीही कल्पना नसताना, शारिरिक आणि मानसिकरित्या तयार नसतानाही अश्विनने प्रवासाला सुरुवात केली. या प्रवासात त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही कारण त्याला माहित होतं जर त्याने मागे वळून पाहिलं तर कदाचित तो माघार घेईल.
प्रवासात राष्ट्रीय महामार्गावर पोहोचल्यानंतर समोरचा न संपणारा रस्ता पाहून अश्विनच्या मनात यापुढचा प्रवास ट्रेनने करावा असा विचारदेखील आला. मात्र काहीतरी नवीन करण्याच्या हेतून त्याने प्रवास सुरु ठेवला. दरीखो-यातून प्रवास करत कधी मंदिर, धर्मशाळेत,गावात अश्विनने मुक्काम केला. एक वेळ तर अशी आली होती की पुर्ण शरीर थकलं होतं, पुढचा प्रवास करणंच शक्य नव्हतं.
दिवस- रात्र ६०० किमी प्रवास करत अश्विन अखेर ६ दिवसांनी अहमदाबादला पोहोचला. कुटुंबिय आणि कोकोनेदेखील त्याचं स्वागत केलं. 'या प्रवासात मी अनेक गोष्टी शिकलो. अनेक भावनांतून मी गेलो पण सर्वात महत्वाचं संयम शिकलो. तुम्हाला कितीही यातना होत असतील तरी हसत कसं राहावं हेदेखील शिकलो', असल्याचं अश्विनने सांगितलं आहे.