Delhi Election 2019 : 'आमचे सरकार आल्यास 600 युनिटपर्यंत मोफत वीज देणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 06:57 PM2019-12-25T18:57:22+5:302019-12-26T07:47:38+5:30
Delhi Vidhan Sabha Election 2019 : 'छोट्या उद्योगांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत'
नवी दिल्ली : झारखंडनंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने अद्याप दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली नाही. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. यांनतर काँग्रेसनेही दिल्लीवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे.
दिल्लीतील वजीरपूर परिसरात काँग्रेसने बुधवारी जनसभा आयोजित केली. यावेळी दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, "अरविंद केजरीवाल सरकारकडून दिल्लीवासीयांना फक्त 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळत आहे. मात्र, दिल्लीत आमचे सरकार आल्यानंतर 600 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येईल. तसेच, छोट्या उद्योगांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. याचा उल्लेख पक्षाच्या जाहिरनाम्यात करण्यात येणार आहे."
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आतापर्यंत जेवढी विकास कामे झाली नाही. तेवढी विकास कामे गेल्या पाच वर्षात दिल्लीत आम आदमी पार्टीच्या सरकारने केली आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
दुसरीकडे, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे. केजरीवाल सरकारने 509 शाळा आणि 20 नवीन महाविद्यालये सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, असे काहीच केले नाही. याशिवाय, दिल्लीतील रुग्णालयांमध्ये आयसीयू, बेड आणि व्हेंटिलेटर यांसारख्या आवश्यक सुविधा सुद्धा नाही. एवढेच नाही तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: जलबोर्डाचे चेअरमन आहेत. तरी सुद्धा दिल्लीतील जनतेला दूषित पाणी प्यावे लागले, असे भाजपाचे दिल्लीतील अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.