नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) प्रशासकीय इमारतीसमोर बिर्याणी शिजवून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला सहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चीफ प्रॉक्टर कौशल कुमार शर्मा यांनी हा आदेश जारी केला आहे. याआधी काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार ते पाच विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, 27 जून रोजी मोहम्मद आमीर मलिक नावाचा विद्यार्थी प्रशासकीय इमारतीसमोर पाय-यांवर बिर्याणी शिजवण्यात आणि इतर विद्यार्थ्यांसोबत खाण्यात सामील होता. मोहम्मद आमीर मलिक सेंटर ऑफ अरेबिक अॅण्ड अफ्रिकन स्टडीजचा विद्यार्थी आहे. 2013 मध्ये त्याने जेएनयूत अॅडमिशन घेतलं होतं. आदेशात सांगण्यात आल्यानुसार, विद्यार्थ्याने नियमाचं उल्लंघन केलं असून, त्याला सहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दंड भरण्यासाठी विद्यार्थ्याला दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. दुसरीकडे विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही बीफ बिर्याणी होती असा दावा केला आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आमीर मलकिने सांगितलं आहे की, 'रात्री 11 वाजता सर्व ढाबे बंद झाले होते, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी बिर्याणी करायचं ठरवलं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी कुलगुरुंचा विरोध केला, त्यांना जाणुनबुजून टार्गेट केलं जात आहे. आमच्याविरोधात काही खास आरोप नाही आहे. पण कुलगुरु कोणत्याही गोष्टींना नियमविरोधी सांगू शकतात'. अन्न शिजवणं नियमाविरोधात कधीपासून झालं आहे ? असा सवाल यावेळी आमीर मलिकने उपस्थित केला.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, जेएनयूएसयूची माजी जनरल सेक्रेटरी शत्रुपा चक्रबर्तीवर इतर विद्यार्थ्यांसोबत बिर्याणी खाणे आणि कुलुगुरुंच्या कार्यालयातील आंदोलनाचं नेतृत्व केल्याने 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुस-या अन्य प्रकरणांमध्येही त्यांना आरोपी ठरवण्यात आलं असून, प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. याआधी जेएनयू प्रशासन आणि दिल्ली उच्च न्यायालयाने प्रशासकीय इमारतीपासून 100 मीटर अंतरावर निदर्शन करण्यावर बंदी आणली होती.