लखनौ : निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात रविवारी ६१.१६ टक्के मतदान झाले आहे. किरकोळ घटना वगळता या १२ जिल्ह्यांच्या ६९ मतदारसंघात शांततेत मतदान झाल्याचे वृत्त आहे. मुख्य निवडणूक अधिकारी टी. व्यंकटेश यांनी ही माहिती दिली. राज्यात तिसऱ्या टप्प्यात फर्रखाबाद, हरदोई, कन्नौज, मैनपुरी, इटावा, औरैया, कानपूर ग्रामीण, कानपूर, उन्नाव, लखनौ, बाराबंकी आणि सीतापूर जिल्ह्यात ६९ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.१६ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. तथापि, मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिसऱ्या टप्प्यात १०५ महिलांसह एकूण ८२६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६४ तर दुसऱ्या टप्प्यात ६५ टक्के मतदान झाले होते. इटावात जसवंतनगर मतदारसंघात कतैयापुरा येथे मतदारांना धमकविण्याची तक्रार होती. त्यानंतर येथे दाखल झालेले सपाचे उमेदवार शिवपाल सिंह यादव यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. जसवंतनगरमधील सपाचे नगराध्यक्ष राहुल गुप्ता व त्यांचे समर्थक मतदान केंद्राजवळ बसले होते. यावरुन त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी या नेत्यांवर कथित लाठीमार केला.नेत्यांचे मतदान २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सपाने ६९ पैकी ५५ जागा मिळविल्या होत्या. बसपाला सहा, भाजपला पाच तर काँंग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. अपक्षाला एक जागा मिळाली होती. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रीराजनाथ सिंह, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी लखनौ मतदारसंघात मतदान केले. तर, मुख्यमंत्री अखिलेश यादव व मुलायम सिंह यादव यांनी इटावात सैफई येथे मतदान केले. तिसऱ्या टप्प्यात जे प्रमुख उमेदवार होते त्यात मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल सिंह यादव, मुलायम सिंह यांची सून अपर्णा, विद्यमान आमदार रीता बहुगुणा जोशी, कॅबिनेट मंत्री अरविंद सिंह गोप, राज्यमंत्री फरीद महफूज किदवई यांचा समावेश आहे. राज्यात पुढील टप्प्यातील मतदान २३ व २७ फेब्रुवारी, ४ व ८ मार्च रोजी होणार आहे. मतमोजणी ११ मार्च रोजी होईल.
यूपीत ६१ टक्के मतदान
By admin | Published: February 20, 2017 1:20 AM