प्रत्येक कामात मेहनत केली की यश मिळवता येतं. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एक महिला दूध विकून दरवर्षी करोडो रुपये कमावत आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील नवलबेन ही 62 वर्षीय महिला अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. समाजातील एक मोठा वर्ग आर्थिक आव्हानांना तोंड देत असताना नवलबेन दूध व्यवसाय करून दरमहा लाखो रुपयांची कमाई करत आहेत. हे काम त्या एकट्याच करतात. त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया...
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील नगला गावात राहणाऱ्या नवलबेनसाठी दुग्ध व्यवसाय सोपा नव्हता. त्यांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही आणि यश मिळवण्याचा निर्धार केला. नवलबेन यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि हळूहळू त्यांचा व्यवसाय सुरू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवलबेनने 2020 आणि 2021 मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं दूध विकलं आहे. यातून त्यांनी दरमहा साडेतीन लाखांहून अधिक कमाई केली आहे.
तीन वर्षांपासून विकताहेत दूध
नवलबेन गेल्या तीन वर्षांपासून वार्षिक एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दूध विकत आहेत. नवलबेनकडे आता 80 हून अधिक म्हशी आणि 45 गायी आहेत ज्या आजूबाजूच्या अनेक गावांतील लोकांच्या दुधाची गरज भागवतात. गेल्या वर्षी नवलबेन यांनी त्यांच्या घरी दूध कंपनीही काढली आहे. आज नवलबेन 125 जनावरांसह डेअरी फार्म चालवत आहेत.
लोकांना दिला रोजगार
रिपोर्टनुसार, नवलबेन यांना बनासकांठा जिल्ह्याचे दोन लक्ष्मी पुरस्कार आणि तीन उत्कृष्ट पशुपालक पुरस्कार मिळाले आहेत. गांधीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी हा पुरस्कार दिला. नवलबेन यांच्या डेअरीत गावातील 11 लोक काम करतात. जनावरांची काळजी घेण्याबरोबरच हे लोक दूधही काढण्याचं काम करतात. कामगारांसोबत नवलबेन स्वतःही रोज सकाळ संध्याकाळ लक्ष देतात. नवलबेन यांना 4 मुलं असून ती शहरात राहतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.