"रेल्वे स्टेशनवरील PM मोदींच्या एका सेल्फी पॉईंटसाठी तब्बल ६.२५ लाखांचा खर्च"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:46 PM2024-01-03T17:46:00+5:302024-01-03T17:48:10+5:30
देशातील रेल्वे स्थानकांवरही मोदींच्या फोटोसह विविध योजनांची माहिती दिली जात आहे.
नवी दिल्ली - देशात पुढील काही महिन्यात लोकसभा निवडणुकांच रणशिंग फुंकले जाणार आहे. तत्पूर्वी केंद्रातील मोदी सरकारकडून गत १० वर्षांत केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लाभ मिळवू दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी, विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन भाजपाच्या वतीने केलं जात आहे. तर, देशातील रेल्वे स्थानकांवरही मोदींच्या फोटोसह विविध योजनांची माहिती दिली जात आहे.
रेल्वे स्थानकांवर मोदींच्या फोटोसह सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. या सेल्फी पॉईंटवर उज्जला गॅस योजना, हर घर जल योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वनिधी योजना, विश्वकर्मा योनजांसह विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. तसेच, हा नवीन भारत आहे असा मेसेजही या सेल्फी पॉईंटवर दिसून येतो. देशातील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मोदींचा पूर्णाकृती फोटोसह हा सेल्फी पॉईंट आहे. या एका सेल्फी पॉईंटसाठी तब्बल ६.२५ लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती माहिती अधिकार अर्जातून प्राप्त झाली आहे.
मोदी सरकारकडून प्रसिद्धीसाठी आणि जाहिरातबाजीवर मोठा खर्च करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो. अनेकदा या जाहिरातबाजीवरील खर्चाचे आकडेही शेअर केले जातात. आता, रेल्वे स्थानकावरील मोदींच्या सेल्फी पॉईँटवर झालेल्या खर्चाची आकडेवारी आरटीआयमधून समोर आली आहे. येथील एका सेल्फी पॉईंटसाठी तब्बल ६.२५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याचं काँग्रेसने म्हटले आहे. खरं बोलल्याची सजा देण्यात येणार होती, ती देण्यात आली आहे, असे म्हणत काँग्रेसने केंद्र सरकारच्या रेल्वे स्थानकावरील खर्चावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे.