हैदराबाद : वडिलांना व्यवसायात यश मिळावे म्हणून ६४ दिवस उपवास ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. हैदराबादेत ही धक्कादायक घटना घडली. आराधना असे या मुलीचे नाव असून, ती जैन समाजातील आहे. आराधना सेंट फ्रान्सिस शाळेमध्ये ८ व्या इयत्तेत शिकत होती. वडील लक्ष्मीचंद सनसाडिया यांचे सराफा व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान भरून निघावे, त्यांच्या व्यवसायाची भरभराट व्हावी यासाठी आराधना उपवास करीत होती. चेन्नईतील पुजाऱ्याच्या सांगण्यावरून आराधनाच्या आई-वडिलांनी तिला उपवास धरायला लावले होते. आराधनाचे १० आठवड्यांचे चातुर्मास उपवास ३ आॅक्टोबर रोजी पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाने त्याचे पारणे केले. या कार्यक्रमाला तेलंगणाचे एक मंत्री पद्म राव हे देखील उपस्थित होते. पारण्यानंतर लगेचच शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे आराधनाला रुग्णालयात नेण्यात आले. उपासमारीमुळे ती कोमात गेली होती. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. उपवासामुळे तिची आतडी सुकून गेली होती, तसेच दोन्ही किडन्यांचीही मोठी हानी झाली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. मुलाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेने या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून आई-वडिलांनी मुलीला चार महिने उपवास धरायला लावले, असे बाल हक्कुला संगम संस्थेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून जे कोणी या निर्दोष मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या संस्थेने केली आहे. (वृत्तसंस्था)पुजाऱ्याच्या सांगण्यावरून..!६४ दिवसांच्या उपवासानंतर १३ वर्षांच्या मुलीचा हैदराबादेत मृत्यूआराधनाने तिच्या कुटुंबाचा भाग्योदय व्हावा यासाठी चातुर्मासाचे उपवास धरले होते. एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून तिच्या आई-वडिलांनी तिला उपवास धरण्यास सांगितले होते.
६४ दिवस उपवासाने मुलीचा मृत्यू
By admin | Published: October 09, 2016 12:22 AM