ED News: एका मनी लाँडरिंग प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दोन चार्टर्ड अकाउंटण्ट्ससह तिघांना अटक केली. आरोपींमध्ये एक क्रिप्टोकरन्सी ट्रेडर आहे.६४० कोटी रुपयांच्या सायबर फ्रॉड प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने ही कारवाई केली.
या प्रकरणात ईडीकडून आणखी एका आरोपीचा शोध घेतला जात आहे. चौथा व्यक्ती हा आरोपीचा भाऊ असून, तो फरार झाला होता. ईडीने त्याच्या फार्महाऊसवर २८ नोव्हेंबर रोजी धाड टाकली होती. ईडीच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे.
ईडीच्या पथकाने या प्रकरणात दिल्ली, गुरुग्राम, जोधपूर, झूनझूनू, हैदराबाद, पुणे, कोलकाता या शहरातील १३ ठिकाणांवर ईडीच्या पथकाने २८ ते ३० नोव्हेंबर या काळात धाडी टाकल्या होत्या. ईडीने ४७ लाख रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केलेली आहे. तर १.३ कोटी रुपये किंमतीची क्रिप्टोकरन्सीही जप्त केली होती.
दिल्लीतील बिजवासन परिसरात ईडीवर केला होता हल्ला
२८ नोव्हेंबर रोजी ईडीच्या पथकाने दिल्लीतील बिजवासन भागात असलेल्या फार्महाऊसवर धाड टाकली होती. त्यावेळी आरोपी आणि त्याच्या भावाने ईडीच्या पथकावर हल्ला केला होता. यात ईडीचे अतिरिक्त संचालक जखमी झाले होते.