लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताने यंदाच्या वर्षी सुमारे १०० देशांना कोरोना लसीचे ६.५ कोटी डोस निर्यात केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राने संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला आहे, असेही ते म्हणाले.
औषधनिर्मिती क्षेत्रातील एका परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मोदी म्हणाले की, औषधे तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करून या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनविण्याचा आमचा संकल्प आहे. त्याकरिता अनुकूल अशी धोरणे केंद्र सरकार राबवत आहे. देशातील औषधनिर्मिती क्षेत्रामुळे सुमारे ३० लाख लोकांना रोजगार मिळतो, तसेच १३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही मोलाचा हातभार लागत आहे. त्यांनी सांगितले की, २०१४ सालापासून भारतीय आरोग्य क्षेत्रामध्ये १२ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. अशा प्रकारची आणखी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. औषधे व लसींकरता लागणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचे उत्पादन स्वदेशातच होण्याकरिता औषधनिर्मिती कंपन्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. या क्षेत्रात अजून भारताने मोठी कामगिरी करण्याची गरज आहे.
भारतामध्ये उत्तम प्रतिभेचे शास्त्रज्ञ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारतामध्ये उत्तम प्रतिभेचे शास्त्रज्ञ आहेत. हे आपल्या देशाचे खरे सामर्थ्य आहे. त्याचा योग्य उपयोग करून संशोधनाच्या कक्षा आपण विस्तारल्या पाहिजेत.