नवी दिल्ली : मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारतीय लष्कराला साडेसहा लाख नव्या असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत. पुढील काही वर्षांत सेना 12 हजार कोटींच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करणार आहे. भारतीय सैन्याने शुक्रवारी 7.62x31स्क्वेअर मिमी कॅलिबर असॉल्ट रायफलच्या खरेदीबाबत निविदा काढली आहे. ही रायफल 300 मीटर रेंजपर्यंत गोळ्या झाडू शकते.
असॉल्ट रायफलला लष्कराच्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांबरोबरच खासगी कंपन्यांमध्येही बनविण्यात येणार आहे. या कंपन्यांना 24 सप्टेंबरपर्यंत निविदा भरावी लागणार आहे. यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने परदेशातून 1798 कोटी रुपयांच्या 72,400 रायफल खरेदीला मंजुरी दिली होती. सीमेवरील चौक्यांवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी या रायफल वेगवान प्रक्रियेद्वारे खरेदी केले जाणार आहे. या राफलची रेंज जास्त आहे. तर अन्य सैनिकांना कमी रेंजवर मारा करणारी रायफल मिळणार आहेत.
या व्यवहारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले की, बजेट नसल्याने 12 लाखांच्या सेनेला ही महागडी रायफल देणे शक्य होणार नाही. यामुळे या रायफलना इन्फंट्री बटालियनमध्ये तैनात जवानांनाच देण्यात येणार आहे. तसेच इतरांसाठी मोठ्या संख्येने रायफल मेक इन इंडियाअंतर्गत दिली जातील. तिन्ही सेना दलांना एकूण 8.6 लाख असॉल्ट रायफल्सची गरज भासणार आहे.