शीलेश शर्मा नवी दिल्ली : भारताने रोजगार वाचविण्यासाठी लॉकडाऊन मागे घेत सावधगिरीने अर्थव्यवस्था खुली करावी, असे मत व्यक्त करून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. या संकटात गरिबांसाठी सरकारला ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील, असेही त्यांनी सुचविले आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत सोशल मीडियावरील काँग्रेसच्या व्यासपीठावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी कोविड-१९ च्या अर्थव्यवस्थेवरील प्रभाव आणि त्यावर मात करण्याच्या मुद्यांवर विस्तृत चर्चा केली.यावेळी राजन म्हणाले की, कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरिबांना हातभार लावणे, ही काळाची गरज आहे. या संकटाने बेरोजगार झालेल्यांसाठी आणि उपासमार सोसणाऱ्या गरिबांच्या मदतीला सरकारने धावले पाहिजे. यासाठी ६५ हजार कोटी रुपये खर्च लागेल. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता, ही रक्कम खर्च करणे सहज शक्य आहे. राहुल गांधी जगभरातील अर्थतज्ज्ञांशी विचारविनिमय करून जनतेला वाचविण्यासाठी काय पावले उचलणे जरुरी आहे, हे देशाला सांगू पाहत आहेत.
गरिबांसाठी ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 4:23 AM