अहमदाबाद : २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भीषण जातीय दंगलीत नरोडा गाम येथील ११ जणांच्या हत्याकांडप्रकरणी गुजरातमधील भाजपच्या माजी मंत्री माया कोडनानी यांच्यासह सर्व ६७ आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यामध्ये विहिंपचे नेते जयदीप पटेल, बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी यांचाही समावेश आहे. नरोडा गाम हत्याकांडाचा खटला तब्बल २१ वर्षे सुरू होता.
अहमदाबादमधील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. बक्षी यांनी गुरुवारी हा निकाल दिला. निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींपैकी काही जणांनी निकालानंतर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. गोध्रा येथील हत्याकांडानंतर उसळलेल्या जातीय दंगलीमध्येही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. नरोडा गाम येथे घडलेले अकरा जणांचे हत्याकांडही त्यातील भीषण घटनांपैकी एक घटना होती. हा खटला बराच काळ प्रलंबित राहिला. त्या कालावधीत १८ आरोपींचे निधन झाले होते. (वृत्तसंस्था)मूळ ८६ आरोपींपैकी ८२ जणांची बाजू न्यायालयात मांडणारे ॲड. चेतन शाह म्हणाले की, ज्यांच्यावर आरोप ठेवले ते लोक निरपराध होते. त्या लोकांची आता निर्दोष मुक्तता झाली आहे. फिर्यादी पक्षाचे वकील ॲड. शहशाद पठाण यांनी सांगितले, नरोडा गाम येथील हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल.
अमित शाह यांची कोडनानी यांच्या बाजूने साक्ष२०१७ मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माया कोडनानी यांच्यासाठी बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून सप्टेंबर २०१७मध्ये न्यायालयात साक्ष दिली. ११ जणांचे हत्याकांड घडले त्यावेळी मी गुजरात विधानसभेत उपस्थित होते व त्यानंतर सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले होते, असे कोडनानी यांनी न्यायालयाला सांगितले होते.
६ न्यायाधीशांनी पाहिले खटल्याचे कामकाजहत्याकांडप्रकरणी २०१० मध्ये विशेष न्यायाधीश एस. एच. व्होरा यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्यानंतर व्होरा यांची गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यानंतर हा खटला विशेष न्यायाधीश ज्योत्स्ना याज्ञिक, न्या. के. के. भट्ट, न्या. पी. बी. देसाई, न्या. एम. के. दवे यांच्यासमोर चालला. त्यानंतर न्यायाधीश एस. के. बक्षी यांच्यासमोर हा खटला चालला व त्यांनी या खटल्याचा निकाल दिला.
खटल्यात याआधी काय काय घडले..?n नरोडा गाम हत्याकांडातील आरोपींवर भारतीय दंड संहितेचे कलम ३०३, ३०७, १४३, १४७, १४८, १२०(ब), १५३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांना नरोडा पाटिया व नरोडा गाम येथील हत्याकांडप्रकरणी २००८ मध्ये आरोपी करण्यात आले. n नरोडा पाटिया हत्याकांडप्रकरणी विशेष एसआयटी न्यायालयाने ऑगस्ट २०१२मध्ये कोडनानी यांना २८ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र हा निकाल रद्दबातल करून गुजरात उच्च न्यायालयाने कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली होती.