लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या चार टप्प्यांच्या एकत्रित मतदानाची आकडेवारी ६६.९५ टक्के होत असल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला आहे. सुमारे ९७ कोटी मतदारांपैकी ४५.१० कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
यासंदर्भात आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की २०१९मध्ये चार टप्प्यांत ६८.२४ टक्के मतदान झाले हाेते. प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करणे आवश्यक आहे.
आयाेग प्रयत्नशील
जास्त मतदानासाठी निवडणूक आयोग सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी विविध संस्था, इन्फ्लुएन्सर, नामवंत व्यक्तींनी सहकार्य देऊ केले आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले. लोकसभेच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये २३ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील ३७९ जागांकरिता मतदान झाले आहे.
गेल्या निवडणुकीत काय झाले?
चाैथ्या टप्प्यात ६९.१६ टक्के मतदान झाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांतील चौथ्या टप्प्याच्या तुलनेत हे मतदान ३.६५ टक्क्यांनी अधिक होते. तिसऱ्या टप्प्यामध्ये ६५.६८ टक्के मतदान झाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत या टप्प्याच्या मतदानाची आकडेवारी ६८.४ टक्के होती. दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाले होते. २०१९ साली ही आकडेवारी ६९.६४ टक्के होती. यावेळी पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के तर २०१९च्या निवडणुकांत ६९.४३ टक्के मतदान झाले होते.