लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारतीय हवाई दलाने एलएसीवर ६८,००० पेक्षा जास्त सैनिक, ९० रणगाडे व अन्य शस्त्र प्रणालीही देशभरातून तातडीने पूर्व लडाखमध्ये पोहोचवली होती. संरक्षण व सुरक्षा प्रतिष्ठानच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली.
मागील काही दशकांत दोन्ही देशांमध्ये १५ जून २०२०चा सर्वांत गंभीर सैन्य संघर्ष होता. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने लढाऊ विमानांच्या अनेक स्क्वाड्रन तयार स्थिती ठेवण्याबरोबरच शत्रूच्या जमवाजमवीवर २४ तास निगराणी व गुप्त माहिती जमा करण्यासाठी आपली एसयू-३० एमकेआय व जग्वार लढाऊ विमाने तैनात केली होती.
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाने चीनच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी या भागात मोठ्या संख्येने रिमोट संचालित विमानेही (आरपीए) तैनात केली होती. हवाई दलाच्या विमानांनी भारतीय लष्कराच्या अनेक डिव्हीजनला एअरलिफ्ट केले होते. यात ६८,००० पेक्षा अधिक सैनिक, ९० पेक्षा जास्त रणगाडे, पायदळ, ३३० लढाऊ वाहने, रडार प्रणाली, तोफा व अन्य सामग्रीचा समावेश आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर लष्कराने आपल्या लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
हवाई दलाच्या सर्व मोहिमांचे लक्ष्य पूर्ण
- सूत्रांनी भारताच्या समग्र दृष्टिकोनाचा उल्लेख करीत म्हटले आहे की, रणनीती सैन्य स्थिती मजबूत करणे, विश्वसनीय सैन्य दलांना कायम ठेवणे व कोणत्याही स्थितीत प्रभावी पद्धतीने निपटण्यासाठी शत्रूच्या सैन्य जमवाजमवीवर लक्ष ठेवण्याचे होते. - सूत्रांनी अधिक तपशील न देता सांगितले की, हवाई दलाने अत्यंत कठीण परिस्थितीत काम केले व सर्व मोहिमांचे लक्ष्य पूर्ण केले.
युद्धाचीही तयारी...
- हवाई दलाच्या परिवहन ताफ्याने एकूण ९,००० टन वाहतूक केली होती व ही बाब हवाई दलाची वाढती रणनीती, एअरलिफ्ट क्षमता दर्शवते.
- यामध्ये सी-१३०जे सुपर हर्क्युलस व सी-१७ ग्लोबमास्टर विमानांचाही समावेश होता.
- राफेल व मिग-२९ विमानांसह मोठ्या संख्येने लढाऊ विमाने तैनात केली होती. एलएसीच्या आघाडीच्या ठिकाणांवर जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या शस्त्रांची तैनाती करून युद्धाची तयारी वेगाने वाढवली होती.
एअरलिफ्ट क्षमता वाढवली : ऑपरेशन पराक्रमच्या कालावधीतील तुलनेत समग्र ऑपरेशनने भारतीय हवाई दलाची वाढती एअरलिफ्ट क्षमता दाखवली आहे. डिसेंबर २००१मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन पराक्रम सुरू केले होते. हवाई दलाने शस्त्रेही पोहोचवली होती; ९० रणगाडे ३३० लढाऊ वाहने, रडार प्रणाली, तोफा व अन्य सामग्रीचा समावेश. एसयू-३० एमकेआय व जग्वार, लढाऊ विमानेही केली होती तैनात. १५ जून २०२० रोजी दोन्ही देशांत सर्वांत गंभीर सैन्य संघर्ष.