लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा झाली असून त्यात अभिनेता अजय देवगण यांचा ‘तान्हाजी दी अनसंग वॉरियर’ हा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ठरला. ‘सोरारई पोटरू’ हा तमिळ चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री या गटातही त्याला पुरस्कार जाहीर झाले आहेत. बेस्ट फिचर फिल्म या गटात मराठीत ‘गोष्ट एका पैठणी’ची व हिंदीत आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शनचा ‘तुलसीदास ज्युनिअर’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
‘तान्हाजी दी अनसंग वॉरियर’ या चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण, ‘सोरारई पोटरू’ या चित्रपटासाठी अभिनेता सूर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार तानाजी मालुसरे यांची वीरगाथा सांगणाऱ्या ‘तान्हाजी दी अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांबद्दल अभिनेता अजय देवगण यांनी आपले सहकारी व प्रेक्षकांचे आभार मानले.
‘तान्हाजी’ला सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार
‘तान्हाजी दी अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नचिकेत बर्वे व महेश शेरला हे त्याचे मानकरी आहेत, तर ‘सोराराई पोटरू’ या चित्रपटाचे जी. व्ही. प्रकाशकुमार यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दादा लक्ष्मी हा सर्वोत्कृष्ट हरियाणवी चित्रपट ठरला आहे.
राहुल देशपांडे सर्वोत्कृष्ट गायक
‘मी वसंतराव देशपांडे’ या चित्रपटाकरिता राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला. याच चित्रपटासाठी ध्वनी संयोजक अमोल भावे यांना फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम ध्वनी संयोजनाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘टकटक’ या मराठी चित्रपटातील भूमिकेकरिता अनीश मंगेश गोसावी याला बालकलाकार पुरस्कार मिळाला आहे.
विशेष ज्युरी पुरस्कार
‘अवांछित’ व ‘गोदाकाठ’ या भूमिकांकरिता अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. किशोर कदम म्हणाले खूप आनंद झाला. याआधी नटरंग, जोगवा, फँड्री, एक कप च्या, टुरिंग टॉकीज, दिठी या सगळ्या चित्रपटांसाठी हुकलेला पुरस्कार मिळाला आहे. मराठीतील ‘जून’ चित्रपटाकरिता अभिनेता सिद्धार्थ मेनन याला विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘सुमी’ सर्वोत्कृष्ट बालचित्रपट
अमोल गोळे दिग्दर्शित ‘सुमी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार, तर याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदूलकर यांना तर ‘कुंकुमार्चन’ला कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. सामाजिक प्रश्नांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान हा ‘फनरल’ या मराठी चित्रपटाला मिळाला.