नवी दिल्ली : देशातील ६८ टक्क्यांवर दूध भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या मानकांची पूर्तता करणारे नाही. या दुधात डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, ग्लुकोज आणि पांढऱ्या पेंटची भेसळ आढळून आली असून, यामुळे धोकादायक आजार होऊ शकतात, अशी माहिती सरकारतर्फे बुधवारी देण्यात आली. दुधातील भेसळीचा शोध घेण्यासाठी सीएसआयआर- सीईईआरआय पिलानी यांनी नवे तंत्रज्ञान विकसित केले असून, अशा प्रकारचे तंत्रज्ञान तूर्तास इतर कुठल्याही देशात उपलब्ध नाही. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुधाच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी केवळ ५ ते १० पैसे खर्च होणार असून, अवघ्या ४० ते ४५ सेकंदांत ही चाचणी पूर्ण होईल. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रोकेमिकल फिंगरप्रिंटवर आधारित आहे. यामुळे दुधात मिसळण्यात आलेले पाणी आणि रासायनिक पदार्थांसह सर्व प्रकारची भेसळ शोधता येते. (वृत्तसंस्था)
६८ टक्क्यांवर दूध मानकांनुसार नाही
By admin | Published: March 17, 2016 3:33 AM