ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ८ - वडिलांना बिझनेसमध्ये यश मिळावे म्हणून ६८ दिवस उपवास ठेवणा-या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. हैदराबामध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. कुमारी आराधना असे या मुलीचे नाव असून ती जैन समजातील आहे. आराधना सेंट फ्रान्सिस शाळेमध्ये १० व्या इयत्तेमध्ये शिकत होती.
वडिल लक्ष्मीचंद सनसाडीया यांना ज्वेलरीच्या बिझनेसमध्ये मोठे नुकसान झाले होते. वडिलांचे व्यवसायातील नुकसान भरुन निघावे. त्यांना फायदा व्हावा यासाठी आराधनाचा मागच्या ६८ दिवसांपासून उपवास सुरु होता. प्रकृती बिघडल्यामुळे दोन ऑक्टोंबरला आराधनाचा मृत्यू झाला.
मुलाच्या हक्कांसाठी काम करणा-या संस्थेने या प्रकरणी तात्काळ आई-वडिलांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका पूजा-याच्या सांगण्यावरुन आई-वडिलांनी मुलीला चार महिने उपवास करायला लावला असे बाल हक्कुला संगम संस्थेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करुन जे कोणी या निर्दोष मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.