ऑनलाइन लोकमत
कोलार (कर्नाटक), दि. 21 - आजकाल सेल्फीचं वेड इतकं वाढलं आहे की अनेकदा लोकांना आपण कुठे उभे आहोत, काय परिस्थिती आहे याचं साधं भानही नसतं. सेल्फीच्या मोहापायी अनेकांनी आपल्या जीव गमावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पण याच सेल्फीमुळे एका व्यक्तीला मदत मिळाली नाही आणि त्याच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. मंगळवारी कोलार येथे तलावात 68 वर्षाचा म्हातारा बुडत असताना उपस्थित लोकांनी त्यांना मदत करण्याऐवजी सेल्फी काढण्यात आपला वेळ घालवला. अखेर त्यांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.
कोलार येथील ही घटना आहे. 68 वर्षांचे आजोबा तलावात बुडत असताना लोक मात्र फोटो आणि व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. लोक तलावाजवळ जात होते, मात्र त्यांना वाचवण्यासाठी नाही तर सेल्फी काढण्यासाठी. हा एखादा आनंदाचा क्षण असावा अशाप्रकारे लोक सेल्फी काढत आहेत. जणू काही ही संधी किंवा अशा प्रकारचा सेल्फी परत काढायला मिळणार नाही अशाप्रकारे लोकांचं सेल्फीप्रेम ऊतू जात होतं.
हरोहाली परिसरात राहणारे 68 वर्षीय नानजप्पा वेणुगोपालस्वामी मंदिराजवळील तलावात उतरले असता बुडू लागले. त्यांनी आरडाओरड करत मदत मागितली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नानजप्पा यांनी दारु प्यायली होती. यामुळे जेव्हा ते तलावात उतरले तेव्हा त्यांना खोलीचा अंदाज आला नाही. सुरुवातीला काही वेळ ते पोहत होते, पण नंतर बुडू लागले. नानजप्पा यांनी किना-यावर उभ्या लोकांकडे मदत मागितली, पण सर्वजण मुकदर्शक होऊन तमाशा पाहत होते. काही लोकांनी फोटो काढले, तर काहींनी या घटनेचा व्हिडीओ बनवला.
थोड्या वेळानंतर काही लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. नानजप्पा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कोलार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.