ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 25 - गुलमर्गमध्ये रविवारी केबल कार टॉवर कोसळल्यानं 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. जोरदार वारे वाहत असल्यामुळे केबल कारचा टॉवर ढासळला आहे. या घटनेनंतर बचावकार्य राबवण्यात आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमधील 4 लोक हे दिल्लीतल्या शालीमार बाग येथे राहणारे आहेत. सर्व एकाच परिवारातील सदस्य आहेत. तसेच एका मृतकांची ओळख स्थानिक नागरिक असल्याची पटवण्यात आली आहे.मृतांमध्ये दिल्लीतल्या जयंत अंद्रासकर, त्यांची पत्नी मानसी आणि मुलगी अनाघा आणि जान्हवी समावेश आहे. तसेच त्यांचा गाइड मुख्यात अहमद गनीचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर मृतांची ओळख अद्याप पटवण्यात आली नाही. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. तसेच उमर यांनी प्रशासनावरही निशाणा साधला आहे. सोसाट्याचे वारे वाहत असताना केबल कार बंद का केली नाही, असा प्रश्न उमर यांनी उपस्थित केला आहे. ते ट्विट करत म्हणाले, गुलमर्गमधून हृदयद्रावक घटना समोर येते आहे. एका कुटुंबाच्या सुट्ट्यांचा अंत कशा प्रकारे झाला. सहानुभूती देणं पुरेसं नाही. गुलमर्गमधली केबल कार ही पर्यटकांच्या आवडीची गोष्ट आहे. गुलमर्गमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. गुलमर्गमधले हिवाळी खेळ लोकांना खूप आवडतात. जगभरातून लोक जम्मू-काश्मीरमध्ये येत असतात. मात्र पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असलेल्या केबल कारचा टॉवर पडल्याने 7 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात अनेक लोक जखमी झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
गुलमर्गमध्ये केबल कार टॉवर कोसळल्यानं 7 पर्यटकांचा मृत्यू
By admin | Published: June 25, 2017 7:17 PM