- राजू नायक, पणजीविदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या नावाखाली गोव्याच्या पर्यटन खात्याकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या मंत्री-आमदारांच्या परदेश दौऱ्यावर टीका होत असताना यंदा पुन्हा विदेशवारीचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी सात कोटी रुपये उधळण्याचे निश्चित केल्याची माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे.जगातील सात देशांत सहल जाणार असून त्यांची कंत्राटे पर्यटन क्षेत्रातील सात कंपन्यांना वाटून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे संबंधित कंपन्यांनी आपसात स्पर्धा करण्याऐवजी सर्व मिळून राजकारणी व उच्चपदस्थांना खूश करून राजीखुशी नफा कमावण्याची ही कल्पना आहे. मॉस्को, पॅरिस, सिंगापूर, लंडन, स्पेन, बर्लिन व इस्राएल येथे मंत्री व आमदारांचे शिष्टमंडळ भेट देईल.कंत्राटे दिलेल्या कंपन्या व त्याच्या रकमेची यादीच ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. ही यादी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही. मॉस्को येथील सहलीसाठी ९९ लाख ३७ हजार ४९४ रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे. ते मुंबईस्थित ‘गोल्ड माईन’ कंपनीला मिळणार आहे. यादीत शॉन व विन्सन या दोन गोमंतकीय कंपन्या आहेत. त्यांना इस्राएल तसेच पॅरिस व सिंगापूरची कंत्राटे मिळणार आहेत. विदेशी पर्यटक घटले !गोवा सरकारने गेल्या दोन वर्षांत विदेश दौऱ्यांवर २२ कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे उधळले आहेत. या कालखंडात मंत्र्यांनीच विदेशवारीच्या नावावर साडेसहा कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र या काळात गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्याही घटली आहे. २०१३-१४ मध्ये गोव्यात येणाऱ्या चार्टर्ड विमानांची संख्या १,१४१ होती. मागील वर्षी ती ८८९ इतकी खाली आली. गोवा सरकारच्या पर्यटन विपणन विषयक समितीचे एक सदस्य गौरिष धोंड यांनी मात्र, विदेश दौऱ्यांचे समर्थन करताना आंतरराष्ट्रीय महोत्सवात मंत्र्यांचा सहभाग वेगवान निर्णय प्रक्रियेसाठी आवश्यक ठरतो, अशी प्रतिक्रिया दिली.
गोव्यातील मंत्र्यांच्या ‘विदेशवारी’साठी ७ कोटी!
By admin | Published: August 12, 2015 2:41 AM