मुंबई - गुजरात येथील ११ हजार एकर बिगर शेतीसाठी मुंबईतल्या व्यावसायिकाने बँकेच्या आरटी. जी. एस व हवालामार्फत ७ कोटींचा व्यवहार केला. पैसे घेऊन आरोपीच पसार झाल्याने व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. राणमल जूगराज विरवाडीया (५२) असे व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरुन व्ही.पी. रोड मार्ग पोलिसांनी ठगाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामागे हवाला रॅकेटचा सहभाग असल्याने पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.व्ही.पी रोड परिसरात राहत असलेले विरवाडीया यांचा मेटल खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांची ठगासोबत ओळख झाली. आरोपीने त्यांना गुजरातमधील कच्छच्या वर्णु गावात ११ हजार एकर बिगर शेती जमीन विकायची असल्याचे सांगितले. ही जमीन अवघ्या ७ कोटीमध्ये खरेदी करुन देण्याचे अमिष त्यांना दाखविले. विरवाडीयाही त्याच्या जाळ्यात आले. त्यांनी ठगाला होकार देत सुरुवातीला २ कोटी ३८ लाख रुपये बँकेच्या आर.टी.जी.एस मार्फत ़ठगाच्या खात्यात पाठविले. त्यानंतर ४ कोटी ६२ लाख रुपये हवालामार्फत त्याच्यापर्यंत पोहचविले. २६ नोव्हेंबर २०१६ पर्यंत ७ कोटी रुपये त्यांनी ठरल्याप्रमाणे ठगापर्यंत पोहचविले.पैसे देऊनही जमिनीचा ताबा मिळत नसल्याने विरवाडीया यांनी आरोपींकडे पैसे परत करण्यास तगादा लावला.यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विरवाडीया यांनी पोलिसांत तक्रार केली़
गुजरातच्या ११ हजार एकर जमिनीसाठी ७ कोटींचा हवाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 4:46 AM