ध्यास, आवश्यक ती मेहनत आणि मनाचा निग्रह, असा त्रिवेणी संगम साधला गेला की आव्हान कितीही मोठे असो, एखादी व्यक्ती ते लीलया पेलू शकते. असेच अशक्य वाटणारे एक आव्हान नकुल कुमार यांनी शक्य करून दाखवले आहे. टांझानिया देशातील किलीमंजारो हे तब्बल 5895 मीटर उंचीवर असलेले आव्हानात्मक शिखर त्यांनी सर केलेय. अर्थात हे शिखर जगातील अनेक लोकांनी सर केले आहे. पण त्या लोकांना हे शिखर गाठायला किमान 7 दिवस लागतात. पण नकुल कुमार यांनी हे शिखर अवघ्या 23 तासांत सर केले आहे. त्यांच्या या विक्रमाची प्रेरणादायी गोष्ट त्यांच्याच शब्दांत...
नकुल कुमार गिर्यारोहकइस मॅन ऑफ द वर्ल्ड’ अशी ओळख असलेल्या वीम हॉफ यांना मी २०२० पासून फॉलो करत आहे. आपल्या अंगात अमाप ऊर्जा आहे. आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊनही आपण काही करू शकतो, हा विचार वीम हॉफ मांडतात. मला त्यांचा विचार पटला आणि २०२० पोलंडमध्ये कडाक्याच्या थंडीत किमान कपडे परिधान करून १० दिवसांचा एक कॅम्प मी त्यांच्यासोबत केला. त्यानंतर माझ्या मनाने ध्यास घेतला की आपण स्वतःला आणखी आव्हान देत काहीतरी करायला हवे. त्यातून मग टान्झानिया या देशातील किलीमंजारो हे भव्य शिखर गाठण्याची कल्पना माझ्या मनात आली. मी नियोजनदेखील सुरू केले. पण, नेमका कोविड आल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले आणि माझ्या कल्पनेला ब्रेक लागला. लॉकडाऊन संपते न संपते तोच नेमकी पुढच्या वर्षी माझ्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली. माझा उजवा हात जवळपास निकामी झाला होता. पण, त्यातून मी पूर्ण बरा झालो. दरम्यान, माझे आणखी एक वर्ष वाया गेले. त्यातून सावरल्यानंतर २०२४ मध्ये हे शिखर गाठायचेच असा निर्धार केला आणि मी तयारीला लागलो. योग्य ते शारीरीक प्रशिक्षण, मानसिक फिटनेस आणि आहार यावर मी अनेक महिने काम केले. या गिर्यारोहणाचा सराव करायचा म्हणून मी अनेकवेळा माथेरानला पायथ्यापासून माथ्यापर्यंत सलग फेऱ्यादेखील मारायचो. वांद्र्यातील माऊंट मेरीच्या टेकडीवर सलग अनेक फेऱ्या मारायचो. दिवसाकाठी पाठीवर सामान घेऊन १५० ते १८० मजले इतकी चढाई करायचो. ८ ते ९ तास व्यायाम करायचो. पण, मुख्य मुद्दा होता तो तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याचा. एवढ्या उंचीवर गेल्यानंतर श्वासावरचे नियंत्रण मिळवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. तिथल्या वातावरणाची अनुभूती यावी, याकरिता मी अमेरिकेतून एक सिम्युलेटर तंबू मागवला. या तंबूत मी झोपायचो. कारण या तंबूमध्ये मला तेथील वातावरणाची निर्मिती करता यायची. उन्हाळा, थंडी अशा वातावरणाची अनुभूती घेत शरीराला तयार करीत होतो. जवळपास ४५ दिवस मी या तंबूत झोपलो.
...आणि मग तो दिवस आला. माथेरानच्या पाच पट मोठ्या असलेल्या किलीमंजारोवर चढाई करण्यासाठी मी सकाळी साडे नऊ वाजता सुरुवात केली. १८६० मीटरवरून ५८९५ मीटरचा टप्पा मला गाठायचा होता. ही वाट जंगलातून होती. सभोवतालच्या हिरवाईमुळे मला शुद्ध ऑक्सिजन मिळत होता त्यामुळे अधिकच ताजातवाना झालो. एक हजार मीटरचा टप्पा पार केल्यानंतर मी अर्धा तास विश्रांती घेतली आणि परत १ वाजता मी ११ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्गक्रमण सुरू केले. २७०० मीटर ते ३७०० मीटरवर पोहोचण्यासाठी मला जवळपास पाच तास लागले. हा प्रवास अत्यंत दमवणारा होता. सायंकाळी सव्वा सहा वाजता सूर्यास्त झाला आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. सोबतीला वाढत जाणारी बोचरी थंडी. आता मी अत्यंत थकलो होतो. एक किलोमीटर अंतरासाठी मला १ तास लागला. जसजसा वर चढत होतो तसतसा श्वासही लागत होता. त्याचे नियंत्रण करणेही अत्यंत महत्त्वाचे होते. पण, मनाचा निर्धार पक्का होता. साडे दहाला मी पोहोचणे अपेक्षित होते ते मी साडे अकरा वाजता पोहोचलो. आता मात्र मला विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. खाऊन मी एक तास झोपलो. २ वाजता उठलो आणि सहा किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यासाठी मी चालायला लागलो. या प्रवासातील हा टप्पा सर्वांत कठीण आहे. ४७०० मीटरवरून ५८९५ मीटरवर उभ्या सुळक्यासारख्या शिखरावर चढाई करायची होती. नेमके त्याचवेळी माझ्यासोबत जो गाइड होता, तो आजारी पडला. मग, दुसरा गाइड आला. पहिल्या गाइडसोबत सरत्या काही तासांत चांगले सूर जुळले होते. आता नवी व्यक्ती आणि तिही इतक्या अवघड वळणावर भेटली. तिला मी समजणे आणि माझा अंदाज येणे यात काहीसा वेळ जाणारच होता. जसजसे वर चढायला लागलो श्वास अधिकच फुलायला लागला. मी २ मिनिटे चालायचो आणि अर्धा मिनिट विश्रांती घ्यायचो. असे करत पुढे आल्यानंतर पुढचा टप्पा तर फक्त दगडांचा होता. रॉक क्लायबिंगच करायचे होते. स्टेला या दुसऱ्या सर्वोच्च स्थानी मी अडीच तासांत पोहोचणे अपेक्षित होते तिथे पोहोचायला मला साडे तीन तास लागले. आता ओढ लागली होती शेवटच्या टप्प्याची. हा टप्पा म्हणजे ऊरू... सर्वोच्च शिखर. तिथवर पोहोचण्यासाठी आणखी किमान दीड तास लागणार होता. मला रडायला यायला लागले. ७ ते ८ अंश तापमान आणि जोराचे वारे. फार बिकट अवस्था झाली. मनाचा निर्धार तुटेल असे वाटू लागले. २० पावले मी चालायचो आणि २० सेकंद थांबायचो. असे जवळपास दोन तास सुरू होते.
...अन् अखेर मी शिखर गाठले. त्यावेळी डोळे समाधानाच्या आणि आनंदाच्या अश्रूंनी डबडबलेले होते. ध्येयपूर्ती झाल्यामुळे थकवा तर कुठे पळून गेला समजलेच नाही. घड्याळात वेळ पाहिली तेव्हा लक्षात आले की ज्या प्रवासाला साधारणपणे सात दिवस लागतात तो प्रवास मी २३ तास ५५ मिनिटांत पूर्ण केला आहे. तीन-चार मिनिटांत मग परतीचा प्रवास सुरू केला आणि सहा तासांनी मी बेस कॅम्पला परत आलो. सुमारे ३६ तासांच्या या अथक प्रवासानंतर अखेर मी झोपलो. आपल्या क्षमतेपेक्षा खूप काही आपण करू शकतो. पण, त्यासाठी सातत्यपूर्ण योग्य मेहनत, शिस्त अन् निग्रह असणे गरजेचे आहे.