ऑनलाइन लोकमत
रोहताक, दि. २२ - एका गतीमंद नेपाळी महिलेवर अत्यंत क्रूरतेने अत्याचार करुन तिची हत्या करणा-या सात नराधमांना हरयाणातील रोहतकच्या विशेष न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात रोहताकमध्ये ही घटना घडली होती.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाप्रमाणेच या गुन्ह्यामध्ये आरोपींनी अत्यंत क्रूरता दाखवली होती. त्यामुळे न्यायालयाने सातही दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील अल्पवयीन दोषीवर ज्युवेनाईल न्यायालयात खटला चालला आणि नवव्या आरोपीने आत्महत्या केली.
२८ वर्षीय गतीमंद महिलेवर अत्यंत क्रूर पद्धतीने बलात्कार करुन तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह रोहतक-हिस्सार मार्गावरील अकबरपूर गावात निर्जन स्थळी फेकून दिला होता. शवविच्छेदनामध्ये या महिलेच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. गुप्तांगामध्ये दगड आणि ब्लेडचे तुकडे सापडले होते.
शिक्षेवर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सीमा सिंघल यांनी दोषींना प्रत्येकी १.७५ लाख रुपयांचा दंड आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.