उमरिया- मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात 7 हत्तींचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बांधवगड व्याघ्र अभयारण्यात आतापर्यंत 7 हत्तींचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्याने बुधवारी दिली. याप्रकरणी वनमंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच कडक कारवाई करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बाजरी खाल्ल्याने हत्तींचा मृत्यू झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बांधवगड व्याघ्र अभयारण्यात 4 हत्ती मृतावस्थेत आढळले. त्यानंतर आता आणखी 3 हत्तींचा मृत्यू झाला आहे. हे हत्ती 13 हत्तींच्या कळपाचा भाग होते. तसेच, आणखी 3 हत्तींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वन विभागाची टीम कळपातील इतर हत्तींवर लक्ष ठेवून आहे. अभयारण्याचे उपसंचालक म्हणतात की, बाजरी खाल्ल्याने हत्तींचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. पण, पोस्टमार्टमनंतरच नेमके कारण समोर येईल.
हत्तींचा मृत्यू दुःखद आणि हृदयद्रावक : वनमंत्रीहत्तींच्या मृत्यूबाबत वनमंत्री रावत यांनी मंगळवारी रात्री प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले होते की, अभयारण्यातील हत्तींचा अकाली मृत्यू दुःखद आणि हृदयद्रावक आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी गठित करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
साप आणि नागाच्या संबंधामुळे पीक विषारी झाले?येथील बाजरीचे धान्य पिकवणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यांचे असे मत आहे की, शेतात सापाच्या जोडीने संभोग केल्याने पीक विषारी होते. हे पीक खाल्ल्यामुळे हत्तींचा मृत्यू झाला असावा. आता सत्य काय आहे? विष नैसर्गित होते की, कुणी मुद्दाम टाकले, हे शवविच्छेदन अहवालानंतरच कळेल. सध्या या प्रकरणावरून राजकारणही जोरात सुरू आहे. याप्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.