ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २३ - सरकारी व्यवस्था अधिकाधिक पारदर्शी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध स्तरावर उपायोजना करुनही अजूनही व्यवस्थेमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. मध्यप्रदेशमध्ये एका सरकारी कारकूनाच्या घरावर छापा टाकला त्यावेळी त्याच्याकडे तब्बल ६० लाखापेक्षा जास्त संपत्ती उघड झाली.
नरेंद्र गंगावल असे या कारकूनाचे नाव असून तो जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला आहे. लोकायुक्त पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी शाखेने मिळालेल्या माहितीच्या आधारे गंगावलच्या मध्यप्रदेशातील घरावर छापा मारला. त्यावेळी त्याच्या बिछान्याखाली तब्बल सात लाखांची रोकड सापडली.
त्याशिवाय ५५ लाख मुल्य असलेल्या जमिनीची कागदपत्रे, १० लाखाचे दागिने, २० महागडी घडयाळे, पाच आयफोन पोलिसांनी जप्त केले. गंगावल सुट्टीसाठी गोव्यावर निघण्याच्या तयारीत असताना हा छापा मारला. त्याने काही बँकांकडून १० लाखाचे कर्ज घेतल्याचीही कागदपत्रे सापडली. लोकायुक्त इनस्पेक्टर बसंत श्रीवास्तव यांनी या बेहिशोबी मालमत्तेच्या स्त्रोतांचा शोध सुरु केला आहे.