गुवाहाटी : आसाममध्ये पुराचा कहर सुरूच असून ८० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे, तर ७० लाख लोकांना याचा फटका बसला आहे. मुसळधार पाउस आणि पुरामुळे राज्यातील ३३ पैकी २४ जिल्हे प्रभावित झाले आहेत.
मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, ७० लाखांवर लोकांना पुराचा फटका बसला आहे. लोकांना आणि जनावरांनाही या पुरातून बाहेर काढले जात असून शिबिरात ठेवले जात आहे. एकीकडे कोरोनामुळे लोक त्रस्त असताना राज्यात पुरामुळे आणखी संकट वाढले आहे. तरीही आमचे राज्य ही लढाई लढत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार लोकांना सर्वोतोपरी मदत करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली होती आणि राज्यातील सध्याच्या स्थितीची माहिती घेऊन सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले होेते. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बह्मपुत्रा, धनसिरी, भारली, कोपिली, बेकी, कुसियारा आणि संकोच या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.