- हरीश गुप्तानवी दिल्ली : बसपाच्या सात आमदारांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकारण ढवळून निघाले आहे. विधान परिषद निवडणुकीत सपाच्या उमेदवारांना हरविण्यासाठी बसपा पूर्ण ताकद लावेल आणि प्रसंगी भाजप व अन्य कोणत्याही विरोधी पक्षाला मत देण्याची वेळ आली तरी चालेल, अशा शब्दात बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सपाला इशारा दिला आहे. तथापि, मायावती यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मायावती यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, यानंतर काही शिल्लक राहिले आहे काय. मायावती यांच्या वक्तव्यावर टीका करताना सपाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी म्हटले आहे की, मायावती यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की, त्यांची भाजपसोबत हातमिळवणी आहे. ४०३ सदस्यीय विधानसभेत बसपाचे १८ आमदार असून, सात आमदारांनी बुधवारी राज्यसभा उमेदवार रामजी लाल गौतम यांना विरोध केला होता. त्यानंतर मायावती यांनी आपल्या पक्षातील सात आमदारांना निलंबित केले आहे. बहुजन समाज पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या सात आमदारांनी इतर कोणत्याही पक्षात जाण्याची आमची योजना नाही, असे गुरुवारी येथे म्हटले. पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी सात जणांना गुरुवारी निलंबित केले.
भाजपचा राज्यसभा निवडणुकीत बसपा उमेदवाराला पाठिंबा उत्तर प्रदेशील राज्यसभेच्या रिक्त नऊ जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय डावपेच रचले जात असताना घडलेल्या आश्चर्यकारक घडामोडीअंती भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत मायावती यांच्यानेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रामजी गौतम यांना पाठिंबा देण्याचा फैसला केला. राज्यसभेच्या नवव्या जागेसाठी भाजपला स्वत:चा उमेदवार देता आला असता. कारण भाजपकडे २१ अतिरिक्त मते असून १६ मतांची गरज आहे. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या उमेदवाराला ३६ मते मिळणे जरुरी आहे.
भाजपने ३१७ आमदारांच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणून ८ उमेदवार मैदानात उतरविले आहेत. याशिवाय काँग्रेसचे ७, बसपाचे ५ आणि इतर अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याची इच्छा आहे. तथापि, भाजपने नववा उमेदवार न देता समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांना शह देण्यासाठी बसपाची नाराजी दूर करण्याचा पर्याय निवडला. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देतील, या समजुतीने भाजपने यावेळी बसपाला राज्यसभेची जागा दिली. विधानसभेत ४७ आमदार असताना समाजवादी पार्टीने दुसरा उमेदवार का दिला, हेही आश्चर्यकारक आहे. बसपाची पूर्वी भाजपशी तीनदा आणि सपाशी दोनदा युती होती.