विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेला कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी दिल्लीतील सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. विविध राज्यांमध्ये राज्यपालांना निवेदन देण्यात आले. चंदीगडमध्ये शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून राजभवनात जाण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संयुक्त किसान मोर्चाने आधीच घोषित केल्याप्रमाणे कृषी कायदे रद्द करा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल यासाठीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवले आहे. हे निवदेन शनिवारी राज्यपालांच्या सुपूर्द करण्यात आले आहे. चंदीगडमध्ये पंचकुला आणि मोहाली येथील ३२ संघटनांच्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह प्रवेश केला. जिल्हाधिकारी मनदीपसिंग ब्रार आणि एसएसपी कुलदीपसिंग चहलही घटनास्थळी पोहोचले. इथे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय महासचिव युद्धवीर सिंह, दिल्ली प्रदेश अध्यक्ष विरेंद्र डागर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीत नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी अटक केल्याची चर्चा होती. परंतु ते गाझीपूर सीमेवर असल्याचा त्यांनी खुलासा केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत नाही. शेवटी आम्हाला राष्ट्रपतींना निवेदन देण्याशिवाय पर्याय उरला नाही.