रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील जंगलात राज्य पोलीस व तेलंगणा पोलीस यांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या संयुक्त कारवाईत सात अतिरेकी ठार झाले. इपेंटाच्या जंगलात पोलीस व नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली होती. ही अलीकडील काळातील छत्तीसगडमधील मोठी कारवाई आहे.तेलंगणा पोलिसांचे नक्षलवादीविरोधी पथक व छत्तीसगडमधील सुरक्षा दलांनी येथील जंगलात नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला होता. दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या या भागात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. राजधानी रायपूरहून ५00 किलोमीटरवर असलेल्या या भागात त्यांचा शोध सुरू असतानाच, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मृतांमध्ये काही महिलाही आहेत. तसेच जिथे चकमक झाली, तिथे पोलिसांना काही शस्त्रे आणि नक्षलवाद्याचे प्रचार साहित्य सापडले, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. या आधी मार्चमध्ये नक्षलवादीविरोधी पथकाने याच जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला होता. तेव्हा झालेल्या चकमकीत १0 नक्षलवादी मारले गेले होते. त्यात सात महिलांचा समावेश होता. या आधी ३९ ठारही चार दिवसांतील दुसरी कारवाई आहे. या आधी गडचिरोलीच्या जंगलात राज्य पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार कारवाई केली होती. अनेक तास चाललेल्या चकमकीमध्ये ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या कारवायांमध्ये मिळून या आठवड्यात ४६ नक्षली मारले गेले आहेत.
पोलिसांच्या कारवाईत ७ नक्षली ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:49 AM