गुजरातमधील सूरत येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आर्थिक चणचणीतून या कुटुंबानं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
याबाबतची माहिती देताना सूरतचे डीसीपी राकेश बारोट यांनी सांगितले की, एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ही घटना सूरतमधील अडाजण परिसरात घडली. या घटनेने सूरतमधील रहिवाशांना धक्का बसला आहे. ही घटना अडाजणमधील पालनपूर पाटिया स्थित सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये घडली. येथील शांतीलाल सोळंकी यांनी त्यांची पत्नी, आई-वडील आणि तीन मुलांना आधी विष दिले. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील रहिवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर अडाजण पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात झाली.
समोर येत असलेल्या माहितीनुसार सोलंकी यांचा फर्निचरचा व्यवसाय होता. त्यांच्याकडे सुमारे ३५ मजूर कामाला होता. शनिवारी सकाळी जेव्हा त्यांचे कर्मचारी त्यांच्यांशी संपर्क साधू लागले, तेव्हा त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस स्थानिकांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं, त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.