बिहारच्या विधानसभेमध्ये आज जातीय जनगणनेवरील अहवाल ठेवला जाणार आहे. यावर चर्चाही केली जाणार आहे. यापूर्वीच आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे आकडे समोर आले आहेत. यानुसार बिहारमध्ये केवळ ७ टक्के लोकच पदवीधर असल्याचे समोर आले आहे. तर आर्थिक परिस्थिती सर्वच जातींची बिकट आहे.
बिहारमध्ये सामान्य वर्गातील 25.9 टक्के कुटुंबे गरीब आहेत. तर सवर्णांमध्ये सर्वात गरीब भुमिहार आणि ब्राह्मण कुटुंबे आहेत. बिहारमध्ये नुकतीच जातीय जनगणना करण्यात आली होती. या जनगणनेची आता आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती देखील विधानसभेत मांडली जाणार आहे.
बिहारमध्ये 22.67% लोकसंख्येने इयत्ता 1 ते 5 पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. 14.33 टक्के लोकसंख्येने सहावी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. 14.71 टक्के लोकसंख्येने 9वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. 9.19 टक्के लोकसंख्येने 11वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. पदवीधारकांची संख्या फक्त 7% आहे.
गरीबीचा विचार केल्यास मागासवर्गीय 33.16 टक्के कुटुंबे गरीब आहेत. तर अत्यंत मागासवर्गीयमध्ये ३३.५८ टक्के गरीब कुटुंबे आहेत. अनुसूचित जातींमध्ये ४२.९३ टक्के, अनुसूचित जमातीमध्ये 42.70 टक्के, इतर जातींमध्ये २३.७२ टक्के, ब्राह्मणांमध्ये 25.3 टक्के, भूमिहारमध्ये 25.32 टक्के, 24.89 टक्के राजपूत, 13.83 टक्के कायस्थ, पठाण (खान) 22.20% आणि 17.61 टक्के सय्यद कुटुंबे गरीब आहेत.