नंदुरबार : महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बोट उलटून ७ जण बुडाले. यातील दोघांचे मृतदेह सापडले आहेत. होळीची सुट्टी असल्याने गुजरातच्या सुंदरपूर येथील १५ जणांचा ग्रुप येथे गेला होता. स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणाऱ्यांनी यातील ८ जणांचे प्राण वाचविल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली.
मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास तापी नदीच्या उकाई धरणातील बॅकवॉटरजवळील भिंतखुद गावाजवळ ही घटना घडली. पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी, सुरत येथील अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, अंधार पडल्याने त्यात अडथळे येत होते. वेगाने वारा आल्याने बोट अनियंत्रित होऊन उलटली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली. यात नवापूर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.नवी मुंबई, डहाणूत दोघांचा मृत्यूनवी मुंबई : धुळवड साजरी करताना नवी मुंबई आणि पालघरमध्ये दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. डहाणूजवळील अस्वाली स्वान आर्यन (२९) हा धुळवड खेळून झाल्यानंतर तिघा मित्रांसह धरणावर अंघोळीसाठी गेला असताना बुडाला. तर धुळवड खेळून झाल्यानंतर दुपारी विहिरीवर पोहायला गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रबाले गावात घडली. बारावीला असणारा कैलास जाधव हा इतर ४ ते ५ मुलांसोबत येथील महापालिकेच्या विहिरीत अंघोळीसाठी उतरला होता. मात्र त्याला पोहता येत नसल्याने तो विहिरीच्या तळाशी चिखलात रुतला. ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात नेले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.