नवी दिल्ली - गुजरातच्या सूरतमध्ये एक कौतुकास्पद घडना घडली आहे. एका 7 वर्षांच्या मुलाने प्रसंगावधान दाखवून आईचा जीव वाचवला आहे. या मुलाच्या आईला घरामध्ये अचानक हार्ट अटॅक आला होता आणि ती बेशुद्ध झाली होती. यानंतर मुलाने तातडीने 108 वर कॉल करून रुग्णवाहिकेला बोलावलं. 5 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचली आणि महिलेला सिव्हील रुग्णालयात दाखल केलं. तातडीने उपचार मिळाल्यामुळे आईचा जीव वाचवण्यात मुलाने केलेला हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 7 वर्षांच्या मुलाने घाबरून न जाता उचललेलं पाऊल पाहून डॉक्टरही चकीत झाले. त्यांनी मुलाचं भरभरून कौतुक केलं आहे. 7 वर्षांच्या मुलाला इतकी माहिती असणं ही फार मोठी गोष्ट आहे. जर 1 तास जरी उशीर झाला असता तर महिलेचा जीव वाचला नसता. सध्या महिलेची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजू पांडे असं या महिलेचं नाव आहे. बुधवारी मंजू आपल्या मुलासोबत घरामध्ये असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली.
हार्ट अटॅकमुळे आई झाली बेशुद्ध, चिमुकल्याने दाखवलं प्रसंगावधान
40 वर्षीय मंजू पांडे या उत्तर प्रदेशातील अयोध्याच्या रहिवासी आहेत पण आता त्या आपल्या पती मुलासह सूरतमध्ये राहत आहेत. राहुल असं सात वर्षीय मुलाचं नाव आहे. राहुलने दिलेल्या माहितीनुसार, एकदा माझ्या बहिणीने सांगितलं होतं की, कोणाचीही तब्येत बिघडली तर 108 नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावता येते. त्यानुसार राहुलने कॉल करून रुग्णवाहिका बोलावली. आजारी मंजूने सांगितलं की, जेव्हा मला जाग आली तेव्हा मी रुग्णालयात होते.
केलं असं काही की वाचला जीव
बुधवारी दुपारी अचानक उलट्या सुरू झाल्या आणि अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर मंजू बेशुद्ध झाल्या. याच वेळी त्यांचा 7 वर्षांचा मुलगा राहुलने तातडीने 108 वर फोन करून रुग्णवाहिका बोलावली. सिव्हीलमध्ये ऑन ड्यूटी मेडिकल ऑफिसरनी सांगितलं की, हा मुलगा खूप हुशार आहे. सर्वसाधारणपणे मुलं मोबाईलवर गेम खेळत असतात किंवा कार्टून पाहत असतात. मात्र या मुलाने मोबाईलचा योग्य वापर केला. त्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि आपल्या आईचा जीव वाचवला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.