ऑनलाइन लोकमत
ग्रेटर नोएडा, दि. २ - शाळेत कराटेचे प्रशिक्षण घेताना नाकाला गंभीर इजा होऊन ७ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गजल यादव (७) असे मृत बालिकेचे नाव असून ती ग्रेटर नोएडातील एका नामांकित शाळेत दुस-या इयत्तेत शिकत होती. तिचे वडील एका एमएनसीमध्ये जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत.
मंगळवारी दुपारी शाळेत कराटे शिकत असताना गजलच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला. तिला उपचारांसाठी तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गजलच्या पोटात दुखत असल्याची माहिती शाळा प्रशासनाच्या कर्मचा-यांनी तिच्या पालकांना दिली असता त्यांनी तिला घरी सोडण्यास सांगितले. मात्र तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कर्मचा-यांनी सांगितले. हे ऐकताच गजलच्या वडिलांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली, मात्र तेथे त्यांना आपली लाडकी मुलगी मृतावस्थेत आढळली.
विशेष म्हणजे गजलच्या पालकांनी तिचे शवविच्छेदन केले नाही की याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल केला नाही. बुधवारी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी चौकशीसाठी शाळा गाठली, मात्र त्यांना शाळा बंद आढळली. तेथील सुरक्षारक्षकही उडवाउडवीची उत्तरं देत असल्याने या प्रकरणातील संशय बळावला आहे.