हैदराबाद – देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे, अशातच काही ठिकाणी कोरोना रुग्णाशी अत्यंत बेजबाबदारपणे वागणूक होत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तेलंगणामधील करीमनगर येथे कोरोना रुग्णाच्या उपचारात निष्काळजीपणा केल्याचं मोठी घटना उघड झाली आहे.
करीमनगर येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा बेडवरुन पडून मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात रविवारी घडलेल्या या दुर्घटनेत ७० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला उपचारासाठी २२ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मयत रुग्ण हा गंगाधारा मंडलाच्या वैंकटैयापल्ली येथे राहणारा आहे. काही दिवसांपासून रुग्णाला श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यामुळे रुग्णालयात त्यांनी ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं.
रविवारी हा रुग्ण बेडवरुन खाली पडला आणि ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला, त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वार्डात उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांनी असा आरोप केला आहे की, ७० वर्षीय रुग्ण खाली पडल्यानंतर तात्काळ रुग्णालय प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. पण कोणतेही ठोस पावलं उचलली नाहीत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्ण तडफडत होता. पण रुग्णाच्या मदतीसाठी हॉस्पिटलमधील कोणी पुढं आलं नाही. त्यामुळे अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाला.
याच दरम्यान, बेडवरुन पडलेल्या रुग्णाचा आणि वार्डमधील इतर रुग्णांच्या तक्रारीचा व्हिडीओ समोर आला आहे, त्यात रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. मनुष्यबळ कमी असल्याचं कारण देत रुग्णालय प्रशासनाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. तर नातेवाईकांनी याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि कठोर शिक्षा करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. रविवारी करीमनगर परिसरात ५१ कोरोना रुग्ण आढळले, संपूर्ण तेलंगणा राज्यात १५०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यातील ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.