बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील कोतवा पोलीस स्टेशन परिसरात NH 27 वर एका अपघातात वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका कार चालकाने आधी सायकल चालवणाऱ्या वृद्धाला धडक दिली. धडकेनंतर कारच्या बोनेटवर अडकलेल्या वृद्धाला आठ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. यानंतर कार चालकाने ब्रेक दाबून वृद्धाला बोनेटवरून खाली पाडले आणि चिरडलं. त्यानंतर कार चालक कारसह पळून गेला.
अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव शंकर चौधरी असं असून कोतवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांगरा गावचे रहिवासी आहेत. मात्र, पिपराकोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली. मात्र कारचा चालक व इतर प्रवासी पळून गेले. सायकलस्वार शंकर चौधरी हे बांगरा चौकाजवळ NH 27 ओलांडत होते. त्याचवेळी गोपालगंजकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने शंकर चौधरी यांच्या सायकलला धडक दिली.
धडकल्यानंतर शंकर चौधरी हे कारच्या बोनेटवर पडले त्यानंतर वायपरला पकडून धरलं. याच दरम्यान ते आरडाओरडा करत गाडी थांबवण्याची विनंती करत होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांनी ते पाहिले. गाडी थांबवण्यासाठी त्यांनी जोरजोरात आरडाओरडाही केला. तर काही लोकांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. मात्र कार चालक त्याच वेगाने कार चालवत होता.
पाठीमागून येणारे लोक पाहून कोतवा येथील कदम चौकाजवळ चालकाने अचानक ब्रेक दाबला आणि शंकर पुढे पडले. याच दरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोतवा पोलीस ठाण्याचे प्रमुख अनुज कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.परंतु कार चालक व गाडीतील सर्वजण पळून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"