सूरत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबर रोजी 69 वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सूरत येथील ब्रेडलाइनर बेकरीच्या मालकाने मोदींचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरविलं आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त 7 हजार किलो आणि 700 फूट लांब असा केक कापून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. सूरत येथील सरसाना कन्वेंशन सेंटरमध्ये 700 प्रामाणिक लोकांकडून हा केक कापण्यात येणार आहे.
ब्रेडलाइनर बेकरीचे मालक नितीन पटेल यांनी सांगितलं की, हा केक जगातील सर्वात मोठा केक असणार आहे. याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली जाईल. भ्रष्टाचाराविरोधात लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी हा केक कापण्यात येणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. दरवर्षी ब्रेडलाइनर बेकरी मोदींचा वाढदिवस मोठा केक कापून साजरा करतो, हा केक गरीब मुलांमध्ये वाटला जातो.
याचसोबत अतुल बेकरीनेही आदिवासी पाड्यातील 370 शाळांमधील कुपोषित विद्यार्थ्यांना जेवण देणार आहे. जवळपास 12 हजार विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जाणार आहे. कुपोषणाशी लढण्याचा दृढ निश्चय करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येईल. कुपोषणमुक्त भारताचं जे स्वप्न नरेंद्र मोदींनी पाहिलं आहे ते साकार करण्यासाठी आम्ही मदत करू असं अतुल बेकरीचे मालक अतुल वेकारिया यांनी सांगितले आहे.