नवी दिल्ली- जगभरातील 77 देशांमधील तुरुंगांमध्ये 7 हजारांहून अधिक भारतीय नागरिक कैदेत असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचा पंतप्रधानपदी शपथविधी झाल्यावर पाकिस्तानने 26 भारतीय नागरिकांना तुरुंगातून मुक्त केले. पाकिस्तानातील एकूण भारतीय कैद्यांपैकी ही केवळ 6 टक्के इतकीच संख्या आहे. पाकिस्तानबरोबर अनेक देशांमध्ये भारतीय नागरिक तुरुंगवास भोग आहेत.परदेशात तुरुंगवास भोगणाऱ्या भारतीयांच्या आकडेवारीचा विचार केल्यास संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियामध्ये त्यांची सर्वात जास्त संख्या आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे 1690 नागरिक तुरुंगात आहेत. तर सौदी अरेबियामध्ये 1525 भारतीय शिक्षा भोगत आहेत. अमेरिकेत 647 तर नेपाळमध्ये 548 भारतीय तुरुंगात आहेत. त्यानंतर मध्य पूर्वेतील कुवेतमध्ये 484 भारतीय कैदी आहेत तर पाकिस्तानात 471 भारतीय कैदी आहेत, त्यामध्ये 83 लष्करातील आहेत. इंग्लंडमध्ये 378 भारतीय कैदी असून मलेशियामध्ये 298 भारतीय कैदी आहेत. भारताचा आणखी एक मोठा शेजारी देश म्हणजे चीन. चीनमध्ये 226 भारतीय कैदी आहेत तर इटलीमध्ये 225 भारतीय कैदी आहेत.
परदेशी नागरिकांच्या भारतातील तुरुंगवासाचा विचार केल्यास भारतामधील पश्चिम बंगाल राज्यात सर्वाधिक परदेशी कैदी आहेत. या राज्यात देशातील एकूण परदेशी कैद्यांपैकी 56 टक्के परदेशी कैदी आहेत. पश्चिम बंगालमध्ये 1266 परदेशी कच्चे कैदी आहेत तर दोष सिद्ध झालेले 2148 परदेशी कैदी आहेत. महाराष्ट्राचा विचार केल्यास या राज्यात 85 परदेशी कच्चै कैदी तर दोष सिद्ध झालेले 490 परदेशी कैदी आहेत.