ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि रस्त्यांचे प्रभावी जाळे उभारण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी ७०० अब्ज किंवा ७० हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांवरील खर्चासाठी दुपटीने तरतूद करण्याबरोबरच विदेशातून निधी आणण्याचा गडकरी यांचा प्रस्ताव आहे. येत्या तीन वर्षात रस्त्यांच्या प्रकल्पांवर पाच लाख कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव असल्याचे गडकरी यांनी मुलाखतीत सांगितल्याचे वृत्त ब्लुमबर्गने दिले आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महामार्ग, रेल्वे आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे. गुंतवणुकीची कमतरता नसून, केवळ निर्णयप्रक्रिया जलद करण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
एका महिन्यावर केंद्राचे बजेट आले असून त्यामध्ये रस्ते व पायाभूत सुविधांसाठी जास्त तरतूद करावी अशी मागणी गडकरींनी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे केली आहे.
गडकरी यांच्या म्हणण्यानुसार जर पायाभूत सुविधांवर भर दिला तर देशाची अर्थव्यवस्थेच्या वाढीत २ टक्क्यांची भर पडेल आणि ५० लाख लोकांना रोजगार मिळेल. अर्थात, त्यासाठी प्रचंड गुंतवणूक आवश्यक असून विदेशातून कर्ज घेण्याचाही मार्ग अवलंबण्याचे सुतोवाच गडकरींनी केले आहे.
सध्या दर दिवशी १० किलोमीटरची रस्त्याची कामे होतात, ती वाढून १०० किलोमीटर करण्याचे गडकरींचे उद्दिष्ट्य आहे.
अर्थात, मार्च २०१५ नंतर वर्षभरात सरकारने ६,३०० किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे ध्येय ठेवले होते, आणि प्रत्यक्षात ४४१० किलोमीटर रस्ते बांधले. जमीन संपादन करण्यात अडथळे आल्यामुळे ५,१०० किलोमीटरच्या महामार्गाची कामे रखडली आहेत. मात्र, जास्त नुकसानभरपाई देऊन यातून मार्ग काढण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.