नवी दिल्ली : गेल्या मार्च महिन्यात मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या १.१७ टक्क्यांनी वाढून ७०.५२ कोटी झाली आहे. या दरम्यान मोबाईल फोन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ८१.९ लाख ग्राहक मिळविले. ही माहिती जीएसएम आधारित मोबाईल फोनची सेवा देणाऱ्या कंपन्यांची संघटना सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने (सीओएआय) बुधवारी दिली. मार्च २०१५ पर्यंत अखिल भारतीय जीएसएम सेल्युलर ग्राहकांची संख्या ७०.५२ कोटी होती. मार्चमध्ये ती ८१.९ लाखांनी वाढली. गेल्या महिन्याच्या तुलनेत ती १.१७ टक्क्यांनी जास्त आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत जीएसएम ग्राहकांची संख्या ६९.७० कोटी होती. सीओएआयच्या सदस्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर आणि एअरसेलचा समावेश आहे. या संख्येत रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि टाटा टेलीच्या ग्राहकांचा समावेश नाही. सीओएआयने भारत संचार निगम लिमिटेडचे आकडेही घेणे थांबविले आहे. रिलायन्स जियो इन्फोकॉमही सीओएआयमध्ये सहभागी झाली असली तरी कंपनीने अजून दूरसंचार सेवा द्यायला सुरुवात केलेली नाही. ४देशातील सगळ्यात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने २८.९७ लाख ग्राहक बनविले, त्यामुळे तिच्या ग्राहकांची संख्या वाढून २२.६० कोटी झाली आहे. आयडिया सेल्युलरच्या ग्राहकांची संख्या २३.५४ लाखांनी वाढून १५.७८ कोटींवर पोहोचली आहे.दरम्यान, वोडाफोनने १३.५८ लाख नवे ग्राहक मिळवून एकूण ग्राहक १८.३८ कोटी केले आहेत. एअरसेलला ८.६४ लाख ग्राहक मिळून तिच्या एकूण ग्राहकांची संख्या ८.१३ कोटींपर्यंत पोहोचली आहे.
देशात मोबाईल फोनचे ग्राहक ७०.५२ कोटींवर
By admin | Published: April 16, 2015 2:54 AM