नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या अनलॉक 5 च्या नियमावलीनुसार राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सोमवारपासून सुरू झाले आहेत. आता मंदिरे व इतर धार्मिक स्थळंही लवकरच उघडली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध धार्मिक गटांशी चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात एसओपी जारी करण्यात आली असून 15 ऑक्टोबरचा मुहूर्त ठरला आहे.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या घोषणेपासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे एसओपी जारी केली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती लावता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
यापूर्वी सिनेमा हॉल उघडण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी ५० टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, मंत्रालयाला वाटते की, सुरुवातीला २५ टक्के प्रेक्षकांसह सिनेमा हॉल सुरु करावे आणि नियमांची काटेकोरपणे करण्यात यावे.
दरम्यान, मार्चमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन जूनपर्यंत सुरु होता. त्यानंतर ३० जूनला अनलॉक-१ अंतर्गत कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल झाला. ज्यामध्ये आर्थिक निर्बंध उघडले गेले. त्यानंतर, १ जुलैपासून अनलॉक -२ सुरु झाला आहे. आता अनलॉक-5 येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे आणि सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात रेस्टॉरंट व बार सुरू
राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरू झाले. पुनश्च हरिओम अंतर्गत सरकार हे करू शकते तर धार्मिक स्थळं का उघडत नाही, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटली. रेस्टॉरन्ट, बार हे ५० टक्के क्षमतेने उघडण्यास अनुमती देण्यात आली आहे पण धार्मिक स्थळांबाबत अशी अट टाकणे शक्य नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री संबंधितांशी चर्चा करीत असल्याची माहिती आहे. विविध राज्यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. महाराष्ट्रात मंदिरे खुली करावीत, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली होती. मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज्य ठाकरे यांना भेटून मागणी रेटली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यासाठी पंढरपूरमध्ये आंदोलन केले होते.