चंदीगड : कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाने वैद्यकीय सोयी-सुविधा अपुऱ्या पडत असल्याने अनेक इस्पितळे सरकारकडे ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर्स आदी आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरेशा प्रमाणात पुरवा म्हणून विनंती करीत आहेत. अशी स्थिती असताना पंजाबमधील फरिदकोटमध्ये धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीएम केअर फंडातून मागच्या वर्षी फरिदकोटमधील गुरू गोविंदसिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला ८० व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी ७१ व्हेंटिलेटर्स सदोष असल्याचे आढळले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, हे व्हेन्टिलेटर्स एक-दोन तासांच बंद पडतात. भूलशास्रज्ञांनी सांगितले की, केंद्राकडून पाठविण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सवर भरवसा ठेवता येऊ शकत नाही. कारण वापर चालू असताना मध्येच यंत्रे बंद पडतात.
या व्हेंटिलेटर्सचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. वापर सुरू असताना सतत बिघडतात. योग्य दुरुस्ती आणि देखभालीची शाश्वती मिळाल्यािशवाय याचा वापर रुग्णांसाठी करणे शक्य नाही, असे बाबा फरीद आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राज बहादूर यांनी म्हटले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सांगितले की, फरिदकोट वैद्यकीय महाविद्यालयाला ३९ व्हेंटिलेटर्स मिळाली, यापैकी ३२ बिनकामाचे आहेत.
पंजाब सरकारने वैद्यकीय महाविद्यालयाला प्राधान्याने १० नवीन व्हेंटिलेटर देण्याची हमी दिली आहे.
मागच्या वर्षीची यंत्रे आरोग्य विभागात पडूनभारत सरकारने मागच्या वर्षी २५० व्हेंटिलेटर्स पाठविली होती. त्याची एकूण किंमत २५ कोटी होती. यापैकी काही यंत्रे राज्य आरोग्य विभागाच्या भांडारात पडून आहेत. काही यंत्रे वापरताना बिघडली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
‘लाट रोखण्यासाठी जनतेने आज यज्ञ करावा’इंदूर : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्रस्त झालेला असताना त्याच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी गुरुवारी यज्ञ करण्याचा जनतेला सल्ला दिला आहे. यज्ञ ही पर्यावरण शुद्ध करण्याची प्राचीन ‘चिकित्सा पद्धती’ असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे. देशात महामारी आली तेव्हापासून यज्ञाची परंपरा आहे, त्यामुळे कोविड-१९ ची दुसरी लाट सुरू असताना जनतेने १३ मे रोजी सकाळी दहा वाजता हवन करून आहुती टाकावी, असे त्या म्हणाल्या.