Corona virus updates: देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. देशातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी दिवसरात्र मेहनत करुन रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. पण या लढाईत अनेक डॉक्टरांनाही आपला जीव गमावावा लागत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत देशात आतापर्यंत ७१९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) दिलेल्या माहितीनुसार यात सर्वाधिक बिहारमध्ये तब्बल १११ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत १०९ डॉक्टरांचा बळी गेला आहे.
उत्तर प्रदेशात दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ७९ आणि पश्चिम बंगालमध्ये ६३ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेत देशात एकूण ७४८ डॉक्टरांना आपला जीव गमावावा लागला होता. आयएमएच्या माहितीनुसार दुसऱ्या लाटेत झालेल्या डॉक्टरांच्या मृत्यूत सर्वाधिक ३० ते ५५ वयोगटातील डॉक्टरांचा समावेश आहे. यात निवासी आणि इंटर्न डॉक्टर्सचाही समावेश आहे.
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८४ हजार ३३२ नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता २,९३,५९,१५५ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत देशात ४,००२ जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमुखींचा आकडा आता ३ लाख ६७ हजार ०८१ वर पोहोचली आहे. देशात सध्या १० लाख ८० हजार ६९० सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.